जळगाव, 7 ऑक्टोबर: सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव व मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सहायक आयुक्त समाजकल्याण. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा जात पडताळणी कार्यालय, धुळे येथील नवनियुक्त संशोधन अधिकारी प्रमोद राणेराजपूत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन, अभ्यासाचे नियोजन तसेच उपलब्ध शैक्षणिक व करिअरच्या संधींचा प्रभावीपणे उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक अजय ठाकूर, गृहपाल निखिल महाजन, सतीश सोनवणे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनी कु. रोशनी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र पाटील यांनी आभार मानले.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व विविध करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळून अभ्यासाची प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
हेही वाचा: Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ






