ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑक्टोबर: शासकीय सेवा आणि विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा. येथे ‘सेवा संकल्प’ अभियान व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध विभागांच्या माध्यमातून एकूण 440 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.
महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला. यामध्ये रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्याची ८४ प्रकरणे, नवीन रेशन कार्डचे ८० लाभार्थी, दुबार रेशन कार्डची ९ प्रकरणे, धान्य लाभाचे ९, दिव्यांग लाभाचे ९, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १ प्रकरण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची ३९ प्रकरणे, आधार अद्ययावतची ५ प्रकरणे आणि उत्पन्न दाखल्यांची ५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
आरोग्य विभागामार्फतही नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये २१ नागरिकांची आरोग्य तपासणी, ५३ नवीन ABHA कार्ड, आयुष्मान भारत योजनेची ४० नवीन प्रकरणे तसेच CSC च्या माध्यमातून ५ आधार अद्ययावत प्रकरणे करण्यात आली. याशिवाय १६ नागरिकांना अधिवास दाखल्याची सेवा देण्यात आली.
कृषी विभागाच्या माध्यमातून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १५ अर्ज स्वीकारण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना कार्यालयांच्या फेऱ्या कमी करणे शक्य झाले.
शासकीय योजना व सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांची ओळख करून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि शासकीय यंत्रणा व नागरिकांमधील दरी कमी करणे, हा ‘सेवा संकल्प अभियान’चा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ






