बीड, 14 जानेवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर आता मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमकी काय आहे बातमी? –
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याची आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्याला केज न्यायालायत हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर अधिकाऱ्यांनी कराडवर मकोका लावण्याबाबतचा अर्ज दिल्यानंतर त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला आता उद्या मकोका कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक –
दरम्यान, वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ त्याच्या समर्थकांनी सकाळपासूनच सकाळपासून तीव्र आंदोनलन सुरू केले होते. अशातच वाल्मिक कराडवर याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी परळी बंदची हाक दिल्याने शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली –
वाल्मिक कराडच्या मातोश्री ह्या आज सकाळपासून परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. असे असताना कराडच्या मातोश्री पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मुलाला न्याय मिळावा, म्हणून त्या सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; नवीन एसआयटी स्थापन, ‘एकही आरोपी सुटता कामा नये’, मुख्यमंत्र्यांचे आदेश