जळगाव, 19 सप्टेंबर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून जळगावात माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत 17 मार्च बुधवार रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर हा मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीचे निवदेन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः न आल्याने बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताला झुगारत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली होती.
View this post on Instagram
दरम्यान, याप्रकरणी बच्च कडू-उन्मेश पाटील यांच्यासह 13 जणांविरोधात गुन्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी नसताना जमावासह प्रवेश करणे आदी मुद्यांवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.
ASP अशोक नखाते यांची माहिती –
याप्रकरणाची माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले की, जळगाव शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला होता. सदर मोर्चा हा माजी खासदार उन्मेश पाटील तसेच माजी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आणण्यात आला होता. सदर मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सदर मोर्चा आणून उपस्थित आंदोलकांना संबोधित करून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन द्यायचं असं निश्चित करण्यात आलं होतं. याबाबतची नोटीस त्यांना देण्यात आली होती.
मात्र, मोर्चातील उपस्थित शेतकऱ्यांना संबोधन केल्यानंतर अचानक मोर्चाचे नेतृत्व करणारे बच्चू कडू तसेच उन्मेश पाटील आणि इतर 11 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घ्यायला बोलवावे आणि ते जर आले नाही तर आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करू. याबाबतची माहिती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर निवदेनकर्त्यांसोबत दालनात चर्चा करणं योग्य होईल, असं त्यांनी आम्हाला कळवलं होतं.
उन्मेश पाटील तसेच बच्चू कडू यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल –
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचं ऐकून न घेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या प्रतिबंधला झुगारून गेट उघडत आतमध्ये प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्याच्या मुख्य द्वारावर देखील त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला असता 20 पेक्षा अधिक लोक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले. इतर आंदोलकांना पोलिसांनी बाहेर रोखून ठेवले. परंतु, परवानगी नसताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला आणि पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. यामुळे जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेनुसार, 132, 221, 189 (2) (3), 49, 54 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये 37(1) (3), 135, 68, 140 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी नसताना जमावासह प्रवेश करणे आदी मुद्यांवरून ही कलमे लावण्यात आली असून उन्मेश पाटील तसेच बच्चू कडू यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिलीय.