ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : सध्या सर्व निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यामध्ये निवडणुकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वच घडामोडींवर कसोशीने लक्ष दिले जात आहे. मात्र, यातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बीएसएफ जवानाने पोस्टल मतदन करुन मतदान पत्रिकेचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
कमलेश हेमराज पाटील असे या बीएसएफ जवानाचे नाव आहे. ते पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असून ते सध्या सीमा सुरक्षा बल आसाम येथे सेना दलामध्ये कार्यरत आहेत. याप्रकरणी नायब तहसिलदार रणजित पाटील यांनी तक्रार केली.
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी पत्राद्वारे आदेशित केलेल्या माहितीनुसार, सेना दलातील जवान कमलेश हेमराज पाटील (रा. तारखेडा, ता. पाचोरा) त्यांना पुरवण्यात आलेल्या पाचोरा विधानसभा मतदारसंघाची डाक मतपत्रिकेवर त्यांनी त्यांनी मतदान नोंदवून ती मतपत्रिका आज 6 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे बीएसएफ जवान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलिसांत गुन्हा दाखल –
त्यानुसार भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांनी कमलेश हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी पोस्ट मतदान करुन मतपत्रिकेचा फोटो त्यांच्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर केल्याचे सांगितले. त्यामुळे पाचोरा मतदारसंघाची पोस्टल मतपत्रिकेवर मतदान करुन ही मतपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करुन मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी बीएसएफ जवान कमलेश हेमराज पाटील यांच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनित्व अधिनियम 1951 चे कलम 136 (1 ग), 136 (2 ख) नुसार पाचोरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणूक : पाचोऱ्यातील चार शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?