भुसावळ, 30 मे : जळगाव जिल्ह्याला हादरवणारे दुहेरी हत्याकांड भुसावळात काल घडले. भुसावळात काल झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध घेतला जात होता. आता याप्रकरणी पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.
संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ संशयीतांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित करण परतुडे (रा.भुसावळ) यास नाशिक येथून तर राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया हे गुजरात मध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघांची निघाली एकाच वेळी अंत्ययात्रा –
याप्रकरणी शिव पथरोड, विनोद चावरिया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करण पथरोड, नितीन पथरोड अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गोळीबारात मृत झालेले माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची आज एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. दरम्यान, मोठ्या पोलिस बंदोबस्तात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भुसावळ गोळीबार प्रकरण –
भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासोबत इतर तिघे जण जुना सातारा रोड भागात कारमधून जात असताना कार मरिमाता मंदिर परिसरात दबा धरून बसलेल्या दोघे अज्ञातांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे कारमध्ये जागेवरच कोसळले. दरम्यान, या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. यानंतर भुसावळ शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते.