जालना, 26 फेब्रुवारी : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कालपासून आक्रमक भूमिका घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून जवळपास 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मराठा आरक्षणा दरम्यानच्या आंदोलनात पोलिसांकडून पहिल्यांदाच थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यातील शिरुर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जरांगेंसह जवळपास 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 425 गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित –
मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे आता पुढील एक-दोन दिवस उपचार घेऊन मराठा बांधवांच्या भेटीसाठी गावागावात फिरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, मराठा आंदोलन चिघळू नये, यादृष्टीने राज्य सरकारकडून खबरदारीची पावले उचलली आहेत.
हेही वाचा : Crime News : पतीने पत्नीला जंगलात नेत केली हत्या अन् स्वतःलाही संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना