नागपूर, 5 नोव्हेंबर: राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून, अशा परिस्थितीत त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे सणाच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचाही सहभाग असावा आणि आपण एकटे नसल्याची जाणीव व्हावी, या भावनेतून प्रत्येक मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, आ. परिणय फुके, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
दुष्काळावर सर्व मिळून मात करूया
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. शेतीशी संबंधित अडचणींचा परिणाम केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना आवश्यक असलेले सहकार्य आणि मदत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या मदतकार्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे ते म्हणाले.
मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांशी संवाद साधावा, त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा व्यापक सामाजिक संदेश अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरू शकतो, असे ते म्हणाले. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास मदतीचा आवाका वाढू शकतो. याच भावनेतून मंत्र्यांनी दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवावा. मीही नागपूर जिल्ह्यातील एका गावात एक दिवस जाणार आहे. दुष्काळावर सर्व मिळून मात करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूरच्या वतीने मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सूपूर्द
माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक कार्यालय, नागपूरच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र केलेला मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी देण्यात आला.






