ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील दोन महत्त्वाच्या प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पाचोर्यातील प्रभाग क्र.11-अ आणि 12-ब या दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.
पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली –
पाचोरा नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या 2 डिसेंबर रोजी मतदाना पार पडणार आहे. मात्र, आता पाचोऱ्यात प्रभाग क्र. 11- अ आणि 12- ब या दोन जागांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय. पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी या संदर्भात माहिती दिलीय.
View this post on Instagram
याबाबत बोलताना मंगेश देवरे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर म्हणजेच 23 नोव्हेंबर किंवा तदनंतर देण्यात आलेल्या आदेशाच सहभाग असलेल्या नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. यानुसार, पाचोऱ्यातील प्रभाग क्र. 11-अ आणि 12-ब मधील निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, ईव्हीएम मशीन सेटिंग सिलिंग करून प्रभाग क्र. 11-अ आणि 12-ब या जागांची मतपत्रिका काढून उर्वरित ज्या मशीन आहेत त्याचे पुन्हा सेटिंग सिलिंग होईल. यामध्ये दोनच मतपत्रिका राहणार असल्याचेही मुख्याधिकारी मंगेश देवरे म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील या प्रभागमधील जागांची निवडणूक पुढे ढकलली –
अमळनेरमधील प्रभाग क्र 1- अ, सावदामधील प्रभाग क्र. 2-ब, 4- ब आणि10- ब, यावलमधील प्रभाग क्र. 8 – ब, वरणगावमधील प्रभाग क्र. 10-अ आणि 10- क, पाचोरामधील प्रभाग क्र. 11- अ आणि 12 – ब तसेच भुसावळमधील प्रभाग क्र. 4-ब, 5-ब आणि 11-ब या प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय.
नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान –
राज्य निवडणूक आयोगाकडून 4 नोव्हेंबर रोजी नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच बुधवार 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोमवार 1 डिसेंबर रोजी उमेदवारांना रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आलीय.
हेही वाचा : अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार






