चाळीसगाव, 10 जानेवारी : चाळीसगाव नगरपरिषदेकडून नागरिकांच्या तक्रारी अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सोडविण्यासाठी ‘तक्रार निवारण – चाळीसगाव एनपी’ हे नवे मोबाइल अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. चाळीसगाव नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या हस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपमुख्याधिकारी बाळू पारधी, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न –
नागरिक सेवा अधिक सुलभ, तंत्रज्ञानाधारित आणि प्रभावी व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी या अॅपच्या विकासासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ साधत नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
कशी असेल प्रक्रिया? –
तक्रार निवारण अॅपच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या नगरपरिषदेकडे आपल्या समस्या नोंदवू शकणार आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, स्ट्रीट लाइट, ड्रेनेज, बांधकाम आदी विविध विभागांशी संबंधित तक्रारी सहजपणे अॅपवर नोंदविता येणार आहेत. नोंदवलेली तक्रार थेट संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविली जाणार असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
तक्रारीच्या निवारणाची सद्यस्थिती नागरिकांना रिअल टाइम ट्रॅकिंगद्वारे पाहता येणार असून समस्या सुटल्यावर मोबाइलवर तात्काळ सूचना मिळणार आहे. नागरिकांनी ‘तक्रार निवारण – चाळीसगाव एनपी’ हे अॅप डाउनलोड करून मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. ओटीपीद्वारे खात्री झाल्यानंतर तक्रार नोंदविता येईल. तक्रारीसोबत छायाचित्र अपलोड करण्याची सुविधाही अॅपमध्ये देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पेपरलेस कामकाजास चालना मिळून तक्रार निवारण प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.






