मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 29 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात आज महायुती तसेच महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाकडून प्रा. चंद्रकांत सोनवणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, चोपड्यात आता प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा अर्ज दाखल –
शिवसेना शिंदे गटाकडून चोपड्याच्या विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज चोपड्यात मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोठी रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच महायुतीतील नेते-पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांचा अर्ज दाखल –
चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजू तडवी यांची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काल राजू तडवी यांच्याऐवजी प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना कालच मातोश्रीवर एबी फॉर्म देखील देण्यात आला होता आणि आज शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत चोपड्यात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपड्याचे आमदार म्हणून प्रथमतः निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी भाजपमध्येमध्ये असलेले प्रभाकर सोनवणे ह्यांनी 2019 साली अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना लताताई सोनवणे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले होते. आणि आता त्यांना शिवसेनना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार आहे.
हेही वाचा : जळगाव ग्रामीणसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल