मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोजक्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. काल सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली. तसेच निमंत्रितांना मंगळवारी सकाळी 9 वाजता राजभवनातील कार्यक्रमस्थळी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळ यांनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली.
पक्ष नेतृत्त्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ हे भाजपमध्ये जाणार का, अशाही चर्चा होत होत्या. अखेर आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला.
राष्ट्रवादीचे माजी धनंजय मुंडे यांना मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावरून पक्षात वाद होऊ नये म्हणून अजित पवार यांनी हे खाते काही महिने आपल्याकडेच ठेवले होते. यानंतर आज छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर त्यांच्याकडे हे खाते येईल असे बोलले जात आहे.
छगन भुजबळ हे मागील काही महिन्यांपासून नेतृत्वापासून दूरदूरच होते. दरम्यान, आता या महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे भुजबळांना नाराज ठेवणे महायुतीला परवडणारे नाही. याच कारणातून भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही पाहा : भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत