लंडन, 19 फेब्रुवारी : आज संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. इतकेच नव्हे तर परदेशातही लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात आली. ब्रिटेनमधील लंडन येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथील संसद चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थांनी लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’ तसेच जय भवानी जय शिवाजी घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडला.
लंडनमध्ये छत्रपती शिवराय –
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देणारे अनेक युद्ध साहित्य लंडन येथील म्यूजियमला आहे. तसेच शिवाजी महाराजांचे एक अस्सल पेंटिंगदेखील ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहे. जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या संसद चौकात साजरी करताना उपस्थित युवकांत नवचैतन्य निर्माण झाले होते.
भारतीय विद्यार्थ्यांनी व्यक्त केली ही भावना –
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता त्यांचा आदर्श आणि त्यांचे विचार संपूर्ण जगाने घ्यावे, याच भावनेतून आम्ही याठिकाणी शिवजयंती साजरा केली, अशी भावना या भारतीय विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
लंडन येथे साजरा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रम समितीमध्ये अॅड.संग्राम शेवाळे, ओंकार कोकाटे, धैर्यशील काळे, विनायक गर्जे, अॅड. दिपक चटप, डॉ. ऋषिकेश आंधळकर या भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.