ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 29 जुलै: पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन व आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ उद्या गुरुवार, 30 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. पाचोऱ्यातील गिरड रोड, DYSP कार्यालयासमोर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात तब्बल 19 शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच अनेक सेवांचा प्रत्यक्ष लाभ देणार आहेत.
महसूल विभागामार्फत डिजिटल 7/12, फेरफार नोंदी, उत्पन्न, जात, अधिवास (डोमिसाईल), नॉन-क्रीमीलेअर दाखले आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज, ई-केवायसी व मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरवठा विभागाकडून नवीन रेशनकार्ड, नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे तसेच प्राधान्य कुटुंब योजनेबाबत सेवा दिली जाणार आहे.
कृषी विभागामार्फत पीएम-किसान योजना, ॲग्रीस्टॅक मंजुरी, महाविस्तार ॲपची माहिती तसेच विविध योजनांअंतर्गत कृषी अवजारांचे वितरण होणार आहे. महावितरणकडून सोलर रूफटॉप, स्मार्ट मीटर व नवीन वीज जोडणीबाबत माहिती दिली जाईल. पंचायत समितीमार्फत केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजना, विहीर, शेड, कृषी व इतर अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
याशिवाय वन विभाग, भूमी अभिलेख, आरटीओ, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस व वाहतूक शाखा, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, नगरपालिका, सहायक निबंधक सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका तसेच बीएसएनएल विभागामार्फत विविध योजनांची माहिती, सेवा व मार्गदर्शन नागरिकांना दिले जाणार आहे.
ग्रामीण रुग्णालयामार्फत आयुष्मान गोल्डन कार्डचे वितरण, रक्तदान शिबिर तसेच मोफत शस्त्रक्रियांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. महिला व बाल विकास विभागाकडून लेक लाडकी, मातृवंदना व महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांची माहिती मिळणार आहे. सहकारी संस्थांमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ तसेच विविध व्याज सवलत योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या समाधान शिबिराचा लाभ घेण्यासाठी पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
हेही वाचा: Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन






