मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. तसेच या सूचनांवर काय कार्यवाही केली गेली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालील निर्देश दिले.
काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 7 कलमी कृती कार्यक्रम –
1. कार्यालयाच्या संकेतस्थळांवर माहिती अद्ययावत करा, सायबर सुरक्षितता सुनिश्चित करा. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या.
2. शासकीय कार्यालये स्वच्छ ठेवा, अनावश्यक कागदपत्रे आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करा
3. शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह राहील यांची खात्री करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे.
4. स्थानिक पातळीवर 2 सुधारणा लागू करा, प्रलंबित कामे शून्यावर आणा; अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील यासंबंधी माहिती फलक तयार करा
5. स्थानिक पातळीवरील प्रश्न तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी लोकशाही दिनासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवा.
6. ‘इज ऑफ वर्किंग’ साठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांचे अधिकारी व उद्योजकांशी संवाद साधावा
7. जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम, योजना तसेच गाव, शाळा, आरोग्य केंद्रांना भेटी द्या; यासाठी वेळापत्रक निश्चित करावे आणि संबंधित जिल्हा पालक सचिवांनी या सूचनांची अंमलबजावणी होत आहे का? यावर लक्ष ठेवावे.