जामनेर (जळगाव) – खान्देशचे सुपूत्र रामेश्वर नाईक यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी रामेश्वर नाईक यांना याबाबतचे पत्र दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले मंगेश चिवटे हे आधी या पदावर होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता आरोग्यदूत अशी ओळख असलेले मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी रामेश्वर नाईक यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी नाईक यांनी मोठे काम केले आहे.
कोण आहेत रामेश्वर नाईक –
रुग्णसेवा कक्ष हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कक्ष मानला जातो. या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या साथीने रामेश्वर नाईक यांनी रुग्णांसाठी मोठी सेवा बजावली. सर्वसामान्या रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष महत्त्वाची भूमिका बजावतो.
रामेश्वर नाईक हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथील मूळ रहिवासी आहेत. तसेच ते भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यभरात आरोग्यसेवा करीत आहेत. आमदार महाजन यांच्या मदतीने आरोग्यदूत नाईक यांनी लाखो रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली आहे. आरोग्य तपासणी शिबिरे भरवून गोरगरीब, गरजूंना लाभ दिला आहे.
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले.
दरम्यान, जुलै 2021 मध्ये रामेश्वर नाईक वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.
तसेच महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना डॉ. रामेश्वर नाईक यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली. रामेश्वर नाईक हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू समजले जातात. यानंतर आता त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मंगेश चिवटे यांच्या जागी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा कारभार डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे आला आहे.