जळगाव, 1 ऑगस्ट : एरंडोल तालुक्यातीलल खडके बुद्रुक येथील वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच या बालगृहातील बाल लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
तपासासाठी विशेष समिती –
राज्याच्या महिला व बाल विकास आयुक्तालयाने खडके बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपासणी समिती नेमली आहे. शासनाने आधीच नेमलेल्या समितीच्या व्यतिरिक्त पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला ३ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समितीत ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश –
राज्याच्या महिला व बाल विकास आयुक्तालयाने नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय विशेष समितीत खार-सांताक्रूझच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रेमा घाडगे या अध्यक्षा असणार आहेत. तर रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, कोकण विभागातील विभागीय उपायुक्त कार्यालयाच्या जिल्हा परिविक्षा अधिकारी वैशाली परूळेकर, महिला व बालविकास अधिकारी ठाणे कार्यालयाचे विधी अधिकारी अशोक पवार, उल्हासनगरमधील (ठाणे) मुलींचे निरीक्षण गृहाच्या समुपदेशक अनिता निकम यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. दरम्यान, ही समिती आज मंगळवारी जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
चौकशी समिती काय करणार? –
विशेष तपासणी समितीला विभागातील संबंधित सर्व दोषींवर चौकशीअंती प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या समितीला विभागाव्यतिरिक्त इतरांबाबत कारवाई करण्याचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मोरे यांनी दिले आहेत.
लैंगिक अत्याचार प्रकरण –
खडके येथील बालगृहात गेल्या वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजीवाहकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली होती. याप्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडीत, अधीक्षिका अरुणा पंडीत आणि संस्थेचे सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांचे विरुध्द २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी गणेश पंडित व अरूण पंडिता यांना अटक करण्यात आली तर भिवाजी पाटील हा अद्याप फरार आहे.