मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 28 जुलै : आषाढी पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून 10 ते 20 जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात चोपडा आगाराला जवळपास 34 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यात्रेदरम्यान आगारातून 48 वाहनांद्वारे 112 फेऱ्या करण्यात आल्या.
चोपडा आगारास विक्रमी उत्पन्न –
महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींसह आगारास 33 लाख, 78 हजार 825 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे आगारास सवलतीसह 14 लाख 56 हजार रुपयांचा नफा झाला, अशी माहिती आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली. चोपडा आगारास विक्रमी उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.
स्वच्छतेबाबत चोपडा बसस्थानक राज्यात पहिले –
एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये नुकताच राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला आहे. या बसस्थानकाला रू.50 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या 15 ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती, ‘असा’ आहे त्यांचा परिचय