मुंबई, 5 मार्च : अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशात उमटल्याचे दिसून येत आहे. अशातच विरोधकांकडून महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान, यावर राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना देखील100 टक्के जेलमध्ये टाकू असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
अंबादास दानवेंचा सवाल –
विधान परिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, एकीकडे सत्ताधारी म्हणतात कारवाई झाली पाहिजे. तर दुसरीकडे महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलपूरकर आणि प्रशांत कोरटकरवर का कारवाई होत नाही. मी नागपूर सीपींशी बोललो, कोरडकरचा मोबाईल जप्त होतो. मात्र, कोरडकरला पकडलं जात नाही. राहुल सोलापुरकर याच्यावर कारवाई होत नाही. यामुळे सरकार जसं बोलत तसं करून दाखवावं. दरम्यान, अबू आझमींचा तर निषेधच आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. खरंतर, अबू आझमींना सरकार जेलमध्ये का टाकत नाही. आतापर्यंत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे होतं, असेही दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, त्यांना 100 टक्के जेलमध्ये टाकू. मात्र, तुम्ही (अंबादास दानवे) नीट माहिती घेतली असती. तर या कोरटकर यानी कोल्हापुरच्या कोर्टातून स्वतःला अटक करण्याबाबत स्थगिती घेतलीय. यामुळे वरच्या स्तरावर दाद मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो. कोरटकर वैगेरे हे चिल्लर लोक आहे.
पण मला सांगा. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर तुम्ही कधी निषेध केला नाही. जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्य होता. महाराज पाच फुटाचे होते. याचा तुम्ही कधी निषेध केला नाही, असा संतप्त सवाल त्यांनी विरोधकांना केला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी जे लिहिलं त्याचा निषेध तुम्ही (विरोधक) करणार आहात का असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कधीही सहन करणार नाही. “देश-धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था.” यामुळे पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे गोंधळ उडाला असता सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
हेही वाचा : Breaking : वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई; अधिवेशनातला मोठा निर्णय