मुंबई, 20 मार्च : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केलीय. दरम्यान, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे. तत्पुर्वी, काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा 2016 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला.
देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा –
विधानसभेत महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 12 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, राम सुतार यांचे वय 100 वर्ष आहे. अजूनही ते शिल्प तयार करत असून चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
थोडक्यात राम सुतार यांचा जीवन परिचय –
राम सुतार यांचा 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांचं मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिक्षण झालं असून 1952 ते 58 या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केलं. तसेच राम सुतार यांनी 1960 पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ सारखी शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे.