शेंदुर्णी (जामनेर), 16 फेब्रुवारी : आता फिडरचे सोलराइझेशन सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासांची वीज आम्ही देणार आहोत. त्याची व्यवस्था आम्ही केली आहे. 2026 पर्यंत आमचं हे काम संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की, आम्ही शेतकऱ्यांकडून वीजेचे पैसे घेत नाही, ते तसंच पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहू, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ‘अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळावा तसेच नूतन ईमारत पायाभरणी’ कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे संजय गरुड यांनी शेंदुर्णा परिसरातील शेतकऱ्यांच्या वीजेच्या आणि पाण्याच्या समस्या मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी याठिकाणी शाळेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. पण संजय भाऊ तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सांगितलं, 75 टक्के पाणी पोहोचलं, 25 टक्के पोहोचायचं आहे, आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाली केला आहे. त्यामुळे गिरीशभाऊंच्या रुपाने जलसंपदा मंत्री आहेत आणि आपल्या गुलाबरावांच्या रुपाने पाणापुरवठा मंत्री आहेत. त्यामुळे तुम्ही आता याठिकाणी पाणीदार झालेले आहात. पण शेतकऱ्यांसाठी पाणी, विजेच्या समस्या सोडवल्या जातील. तसेच तुम्ही डीपी मागितल्या, हव्या तेवढ्या डीपी तुम्हाला देऊ. काही शेतकऱ्यांनी सोलरकरता पैसे भरले आहेत, पुढच्या 15 दिवसात अशा शेतकऱ्यांना कनेक्शन हे देण्याचे काम आम्ही करू. कनेक्शन नसलेले जितके शेतकरी सोलर मागतील, अशा सर्व शेतकऱ्यांना 2 महिन्यात सोलरचे कनेक्शन देऊ.
पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज –
आता फिडरचे सोलराइझेशन सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासांची वीज आम्ही देणार आहोत. त्याची व्यवस्था आम्ही केली आहे. 2026 पर्यंत आमचं हे काम संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की, आम्ही शेतकऱ्यांकडून वीजेचे पैसे घेत नाही, ते तसंच पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहू, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सीसीआयच्या खरेदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे मी यात लक्ष घालेन. काही वेळा काही शेतकरी, सबग्रेड माल आणतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ज्यांचा चांगला माल आहे, तो मालही या सबग्रेड मालमुळे थांबतो. त्यामुळे असे करू नका. याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी बोलून सीसीआयची थांबलेली खरेदी सुरू, असे आश्वसनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांचा माल हा कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या घरी राहणार नाही. तो विकत घेतला जाईल, अशाप्रकारचा आमचा प्रयत्न असेल.