मुंबई, 8 जून : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. आज 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना झालीय.
आयआरसीटीसी, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे. ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव देईल. सोयीसुविधा, सांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला अशा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनसवरून छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा ट्रेन रवाना झालीय, अशी अतिशय आनंदाची बाब आहे. या रेल्वेत चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोली ते गडहिंग्लजपर्यंतचे 700 पेक्षा जास्त यात्री आज या रेल्वेतून प्रवास करत आहेत. या 700 यात्रींमध्ये 80 टक्के प्रवासी हे 40 वर्षांच्या आतले असून ते शिवरायांचा इतिहास अनुभवण्याकरिता जात आहे. या ट्रेनचा पहिला मुक्काम हा रायगडला असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रेच्या रेल्वेच्या माध्यमातून ही अतिशय प्रेरणादायी यात्रा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रवाशांच्या सुखदायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.