लातूर, 24 सप्टेंबर : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेतीपिके पाण्याखाली गेली असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाला देखील पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, पंचनाम, शेतकऱ्यांना मदत तसेच ओला दुष्काळ आदी मुद्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत बोलताना महत्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत म्हणाले की, राज्यात ज्या भागाच्या शेतीचे नुकसान झालंय त्या भागात सरसकट पद्धतीने शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. नुसतीच मदतच नाही तर टंचाईबाबतच्या जे काही अटी शर्ती आहेत अगदी त्याच अटी-शर्ती अतिवृष्टीला देखील लागू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.
मुख्यमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याबाबत महत्वाच्या सूचना –
राज्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली असल्याने पंचानामे करायला देखील अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशिर होऊ शकतो. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेवढे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत, त्यावर कार्यवाही सुरू केली आहे. ज्याठिकाणी पंचानामे करणे शक्य नाहीये; आपल्या भागात पाणी गेले तेवढेच रेकॉर्डला दिसले पाहिजे यासाठी त्याठिकाणी ड्रोन शूटिंग तसेच मोबाईलवरून फोटो काढले आणि प्रशासनास दिले तरी ते शासनास मान्य असतील.
View this post on Instagram
दरम्यान, यंत्रणनेने देखील नियम व अटी शर्तीवर अडून न राहता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच ज्या शेती भागात जमिनी खरडून गेल्या आहेत त्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत ही वाढून मिळावी अशी मागणी केली जात आहे. म्हणून ती मदत शासनाकडून वाढवून दिली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दिवाळीपुर्वी सगळ्या शेतकऱ्यांना मदत –
आपत्ती व्यवस्थापनाचे नियमांमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्या असून त्याप्रमाणेच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वीच मदत केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले. याआधी नुकसानीचे पंचनामे शासनाकडे आल्यानंतर सहा-सहा महिन्यांनी मदत दिली जायची. मात्र, यावेळेस ज्या-ज्या भागातील पंचनामे शासनास प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना मदत दिली जात आहे. राज्य शासनाच्यावतीने कालच 2200 कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून दिवाळीपुर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
View this post on Instagram
मुख्यमंत्री ओला दुष्काळबाबत काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ म्हणजे ही बोलीभाषा आहे. दुष्काळाचे जी संकल्पना आहे त्यामध्ये ओला दुष्काळ अशाप्रकारची कुठलीही व्यवस्था नाही. साधारण दुष्काळाच्या काळात ज्या काही योजना तसेच सूट राबवितो. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ सोडून सर्व योजना याठिकाणी राबविल्या जातील. त्यामध्ये सर्वात प्रमुख बाब ही विजेच्या बिल स्थगित केले जाते.
View this post on Instagram
मात्र, आता राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना वीजबील माफी करण्यात आली आहे. त्यामुळे वीजेचे बिल घेण्यात येणार नाही. दरम्यान, याव्यतिरिक्तही टंचाईच्यावेळी ज्या काही योजना आपण लागू करतो असा त्याचा अर्थ आपण घेऊ या आणि ते आम्ही करणार असल्याचे स्पष्ठीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.