पुणे – छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करुनच आपण बोललं पाहिजे. इतिहासाचं विकृतीकरण हे कुणाच्याच हाताने होऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अभिनेते राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबाबत कारवाई होत नाही, असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. यावर ते पुण्यात बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पहिल्यांना एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करुनच आपण बोललं पाहिजे. त्यामुळे लोकांची भावना दुखावेल, अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कुणाच्याच हाताने होऊ नये. यासंदर्भात त्यांनी माफीदेखील मागितली आहे आणि त्यासंदर्भात जी काही योग्य कारवाई आहे, ती होईल,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राहुल सोलापुरकरांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य –
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता. तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं राहुल सोलापूरकर एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. अनेकांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यानंतर राहूल सोलापुरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. भांडारकर संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष नंदकुमार फडके यांच्या कार्यालयात राहूल सोलापुरकर यांनी राजीनामा पाठवून दिला.