मुंबई, 27 एप्रिल : राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत असताना सरकारमधील मंत्री तसेच आमदार यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जातो. अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सांगणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता थेट एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना फोन करत अशापद्धतीने वक्तव्य न करण्याची समज दिलीय.
आमदार संजय गायकवाड यांचं नेमकं वक्तव्य काय? –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या आभार यात्रेसाठी आज रविवारी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, त्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होते. ते म्हणाले की, पोलिसवाले काहीच करू शकत नाही. पोलिसांसारखा अकार्यक्षम विभाग हा महाराष्ट्र तसेच भारतात नव्हे तर जगात कुठेच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे शासनाने कुठला कायदा केला तर यांचा हप्ता वाढला. दरम्यान, देशातील तसेच राज्यातील पोलिसांनी प्रामाणिकपणे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ याप्रकारे प्रामाणिकपणे काम केले तर सर्व गुन्हेगारी मिटू शकते, असेही वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होतं.
View this post on Instagram
गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेतली तसेच नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाहीये. मी स्वतः शिंदे साहेबांना याबाबत सांगणार आहे. आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू.
View this post on Instagram
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश
एकनाथ शिंदेंचा गायकवाड यांना फोन –
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत त्यांना फोन करून याबाबत तंबी दिलीय. याबाबतची माहिती स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी दिली. गायकवाड म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी ही वाजवी आहे. तसेच एकनाथ शिंदे साहेबांचा देखील मला फोन आलाय. खरंतर, ज्या लोकांची मी नावं घेतली वैयक्तिक त्यांच्याबद्दल ते माझं विधान होतं.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तबगारीबाबत मला काही बोलायचंच नव्हतं. त्यांच्या कर्तबगारीबाबत आम्हाला अभिमानच आहे. असे असतानाही माझ्याकडून पोलिसांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ज्या लोकांमुळे पोलीस दल बदनाम होतं. त्यांच्यासंदर्भात माझं वक्तव्य होतं आणि मी त्यासोबत ठाम असल्याचेही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं.