मुंबई, 24 मार्च : राज्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त गाण्याप्रकरणी आता प्रतिक्रिया उमटत असून त्यांनी माफी मागवी, अशा पद्धतीची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कुणाल कामराला चांगलेच खडसावले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
विधानभवन परिसरात माध्यमांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार हा कोणालाही नाहीये. खरंतर, कामराला हे माहिती पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे दाखवून दिलंय. कोणाकडे स्व.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेले आहे.
मुख्यमंत्र्यांचा कामराला इशारा –
दरम्यान, राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला आदर आहे. असे असतानाही अशाप्रकारचे खालच्या स्तराच्या कॉमेडी करून, त्यांच्याबद्दल अशापद्धतीने अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा; तुम्ही व्यंग करा. मात्र, जर अपमानित करण्याचे काम कोणी करेल तर हे सहन केले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला.
कामराने माफी मागावी –
कुणाल कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहे, ते जर त्यांनी वाचलं असेल अथवा संविधानबाबत माहिती असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नेमकं प्रकरण काय? –
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन असून विविध ठिकाणी त्याचे शो आयोजित केले जातात. अशातच ठाण्यातील एका हॉटेलात त्यांचा शो पार पडला असता, या शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. यामुळे कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादात आलाय. तर त्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत त्याच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे पोलिसांनी कुणाल कामरावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, कुणाल कामराच्या वक्तव्यावरून शिंदे सेनेचे आमदार-कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.