मुंबई, 8 ऑक्टोबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 7 ऑक्टोबर रोजी FICCI FRAMES 2025 या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांनी एक खास मुलाखत घेतली. या संवादादरम्यान अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.
सध्याच्या पोलिस बुटांमधील हिल डिझाइनमुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ उभं राहणं, धावणं किंवा गस्तीदरम्यान हालचाल करणं कठीण होतं, ज्यामुळे पाठीचे आणि गुडघ्यांचे त्रास वाढतात, असे अक्षय कुमार म्हणाले. या सूचनेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “तुम्ही नवे बूट डिझाइन सुचवा, आम्ही ते पोलिस दलात लागू करू,” असे आश्वासन दिले.
अभिनेते अक्षय कुमार काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाले की, सर, याचा खरं तर चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाहीए, पण मी मुंबई पोलिसांचे बूट पाहिले आहेत. त्यांच्या आत टाच (heels) आहेत आणि त्यात धावणं अजिबातच सोपं नाहीए. एक खेळाडू म्हणून मला जाणवतं की, यामुळे पोलिसांना धावताना पाठीच्या समस्या किंवा स्लिप डिस्क होऊ शकतो.
View this post on Instagram
दरम्यान, जर पोलिसांच्या बुटांचे डिझाइन बदललं, तर महाराष्ट्र पोलिसांसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरेल, ज्यामुळे ते कोणत्याही गुन्हेगारापेक्षा वेगानं धावू शकतील, असे अभिनेता अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादात म्हटले.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद –
अक्षय कुमारच्या या निरीक्षणाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “तुम्ही नवे बूट डिझाइन सुचवा, आम्ही ते पोलिस दलात लागू करू,” असं सांगितले. दरम्यान, या चर्चेनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली