पणजी, 18 ऑगस्ट : राज्यातील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम हा महत्त्वाचा उपक्रम आहे. योग्य मार्गदर्शन आणि तयारीमुळे, विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या प्रवासात यशस्वी होऊ शकतात, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) डिचोली आणि सत्तरीतील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्र भवन, साखळी येथे आयोजित केलेल्या UNOCUE GOA करिअर नेव्हिगेटर कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले? –
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, करिअरचा मार्ग जाणून घेणे हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. ‘आपण काय शिकलोय आणि आपल्याला भविष्यात काय करायचे आहे,’ याची सांगड घालता येणे आवश्यक आहे. अर्थात याकामी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. आज गोव्यात 12 वी सायन्सनंतर करिअरच्या खूपशा संधी उपलब्ध आहेत, मात्र याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने दिशाहीन असल्यासारखे भासत आहेत.
सध्याच्या काळात JEE आणि NEET या दोन परिक्षा देणे आवश्यक आहे. या परिक्षांमधून विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता किती आहे, आपण काय शिकलोय हे सहज लक्षात येईल. यामुळे सर्वांनी या दोन परिक्षा द्याव्यात असे माझे मत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी मांडले. 12 वीचे गणित कळले नाही तर आयुष्याचे गणित सोडवताच येणार नाही, असा आपुलकिचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
वैद्यकिय अभ्यासक्रमाची सुविधा –
ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय क्षेत्रात करिअर करायचे आहे अशांसाठीही गोव्यात चांगल्या सुविधा आहेत. नर्सिंगसाठी गोव्यातील मुलांसांठी 400 सीट उपलब्ध आहेत, फिजीओथेरेपी कॉलेज, नॅचरोपेथीक आणि योगीग सायन्स कॉलेज, बॅचलर ऑफ फॉरेन्सिक सायन्स, आयुष कॉलेज ही देशातील महत्वाची कॉलेज् आज गोव्यात उपलब्ध आहेत. NIT आणि IIT कॉलेजमध्ये गोव्यातील मुलांसाठी 50% जागा उपलब्ध आहेत, मात्र दुदैवाने याबाबत मुलांना माहिती नाही. त्यामुळे करिअर समजून घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्नशील रहा –
फक्त डॉक्टर, इंजिनिअर एवढेच करिअर नाही तर, आत्तापासून जीपीएससी आणि यूपीएससीची तयारी करावी. तुमची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तुम्ही मागे राहू नये, सरकार पूर्ण मदत करण्यासाठी तयार आहे. पुढील वर्षापासून एमबीबीएसच्या मार्गदर्शनासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे एक सेल उघडण्याची योजना असून आत्ताच शिक्षणासाठी सीएम स्कॉलरशिप पोर्टलवर अप्लाय करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. एससी, एसटी, ईडब्ल्यूएस कॅटेगरिसह ज्यांचे पालक खासगी क्षेत्रात काम करतात अशांना सुद्धा स्कॉलरशिप मिळाणार आहे. तुम्ही जी फी भरता तेवढी सर्व फी तुम्हाला स्कॉलरशीपद्वारा परत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी UNOCUE चे धवल गांधी, शिल्पा मेहेरा, SCERT च्या मेघना शेटगावकर, सरिता गाडगीळ तसेच उच्च माध्यमिक आणि 12 वीचे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.