चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 8 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मागील आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी पुढील दोन-तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसुन त्याठीची बैठक आज नवी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीची दिल्लीत बैठक –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुन्हा एकदा जागा वाटपाच्या बैठकीसाठी आज दिल्लीत दाखल झाले आहे. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांची यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जागा वाटपाच्या हालचालींना वेग –
महायुतीत जागा वाटपावरुन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बैठका सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा झाला. यानंतर जागा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील उमेदवारांच्या जागा वाटपाच्या हालचालींना वेग आला. यासाठी दिल्लीमध्ये अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.