मुंबई, 4 ऑक्टोबर : गेल्या काहीदिवसांपासून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रीवादीकडे (अजित पवार गट) राहावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली.
अजित पवारांकडे पुण्याचे पालकमंत्री पद –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आले आहे. तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले –
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
- पुणे – अजित पवार
- अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
- सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
- अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
- भंडारा – विजयकुमार गावित
- बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
- कोल्हापूर – हसन मुश्रीफ
- गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
- बीड – धनंजय मुंडे
- परभणी – संजय बनसोडे
- नंदूरबार – अनिल भा. पाटील
- वर्धा – सुधीर मुनगंटीवार