पुणे, 29 मे : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्यासह त्याचे वडील आणि आजोबा अटकेत आहेत. तसेच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रूग्णालायातील डॉक्टरांनी देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात दिवसेंदिवस मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत असून कितीही मोठा असला तरी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे अपघात प्रकरणाचा आढावा घेतला. दरम्यान, कितीही मोठा व्यक्ती असला कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी या दबावाला बळी न पडता तपास करा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले. तसेच राज्य सरकार पूर्णपणे पोलिसांसोबत असून पोलिसांकडून योग्य कारवाई झाली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
न्याय मिळाला पाहिजे –
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, कोणाचाही हस्तक्षेप या प्रकणात खपवून घेतला जाणार नाही. अपघातात जीव गेलेल्या दोन मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच कोर्टात केस टिकेल, अशा पद्धतीने तपास करा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री पुण्याला जाणार? –
पुणे अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तसेच या अपघात प्रकरणात मोठ्या व्यक्तींचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. अपघातातून धनिक पुत्राला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले असल्याचे देखील आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघात प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ते आज पुण्याला देखील जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : धक्कादायक! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण ठार, काय आहे संपुर्ण बातमी?