नवी मुंबई, 27 जानेवारी : अखेर मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सरकारचे शिष्टमंडळ अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टाईसाठी आले होते. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. यावेळी सरकारने दिलेला अध्यादेश मनोज जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार आहे. तसेच आझाद मैदानात जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: येऊन मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजत त्यांचे उपोषण सोडवलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व देशांचे नाही तर जगाचं लक्ष या आंदोलनाकडे लागले होते. आपली एकजूट आपण काय ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने आपण हे आंदोलन केले, कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता आपण यशस्वी केली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. मनोज जरांगे पाटील यांचे आपल्यावर असलेले प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेले प्रेम हे पाहायला मिळाले. कारण, त्यांनीदेखील प्रत्येक सभेत शिस्तीचा बडगा दाखवला. कारण मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये, म्हणून आपण काळजी घेतली, म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो.
मीदेखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब मराठा समाजाच्या दुखाची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोजदादा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयती पण आहे. या 23 तारखेला बाळासाहेब ठाकरेंची पण जयंती होती. या दोन्ही गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छा पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सर्व तमाम सर्व मराठा बांधवांचं स्वागत करतो.
हा ऐतिहासिक क्षण आहे. स्वर्गवासी आण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा ऐतिहासिक सोहळा होतोय. त्यांनाही मी वंदन करतो. आणि आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, हे गोरगरिबांचे सरकार आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेकांना मोठे केले, मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली, परंतु मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जेव्हा संधी आली, तेव्हा संधी द्यायला हवी होती.
आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. तुमच्या विजयाचा दिवस आहे. गुलाल उधाळायचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, तुम्ही यायला हवे, त्यामुळे मी आपल्या प्रेमापोटी आज आपल्याठिकाणी आलो. आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज मनोज दादांनी आपल्या भाषणात सर्व सांगितले आहे, मराठवाड्यात कुणबी नोंदी दिल्या जात नव्हत्या. लाखो कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत. सरकारची मानसिकता ही देण्याची आहे. आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही.
गावागावात मराठा ओबीसी एकत्र नांदतो. आमच्या हक्काचं आम्हाला हवं आहे, अशी मागणी त्यांनी केली आणि सरकारने तेच केलं. एक सर्वसामान्य माणूस त्याला कुणतीही पार्श्वभूमी नाही, अशा मनोजदादांच्या पाठीशी उभा राहिले. अशा आंदोलनाला एक वेगळेपण आहे. आज मुख्यमंत्रीही सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आपल्याला जोपर्यंत क्युरेटीव पिटिशनच्या माध्यमातून मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला, इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणारं, कायद्याचं चौकटीत बसणारं, ओबीसी, इतर समाजावर अन्याय न करता टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत, मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्या जातील. एक मराठा लाख मराठा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य
आंदोनलामध्ये जे मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देणार आहोत. 80 लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी सरकार करेल. अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं. मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. आपल्याला विनंती आहे की, परतीचा प्रवास सावकाश करावा. हे आंदोलन आणि या मागण्या देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाशी चर्चा करुन हे निर्णय घेण्यात आले आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळतो, तो पाळून दाखवला, असे ते म्हणाले.
जो अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी उद्यापासून करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार दर्शवला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष केला आहे