इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली असून मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मोठमोठ्या सभा आयोजित केल्या जात आहेत. यातच आता पाचोरा भडगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोऱ्याला येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाचोऱ्यात जाहीर सभा –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोरा येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी येत असून पाचोरा शहरातील कैला माता मंदिराशेजारी असलेल्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, ‘आपल्याला माहिती आहे की विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा लाडका भाऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी येत्या 13 तारखेला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी मला 12 वाजेची वेळ दिली असून पाचोरा शहरातील कैलामता मंदिराच्या शेजारी मुख्यमंत्री महोदयांची सभा होणार आयोजित केली आहे’, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, या सभेसाठी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील माताभगिनी, बांधव आणि शेतकरी मित्रांनी, शेतकरी बांधवांनी, शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.