जळगाव, 2 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या शासन निर्णया नुसार प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adveristy) च्या निकषांनुसार 25 टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरिष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात मागील 25 ते 30 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून खरिप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या सर्व समावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 277 शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपल्या पिकाचा पिक विमा काढलेला आहे.
या विम्याच्या निकषानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित करून संबंधित विमा कंपनी कडून पीकविमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने (2.5 mm पेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईस पात्र असून तात्काळ संबंधित विमा कंपनीस याबाबत 25 टक्के अग्रीन स्वरूपात नुकसान भरपाई देण्याच्या जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीना सूचना दिल्या आहेत.