पुणे – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाबद्दल मला अतिशय दु:ख झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात खूप जवळून काम केले होते आणि त्यांच्या अफाट ज्ञान, अनुभव असलेला एक अतिशय अभ्यासू सहकारी मी गमावला आहे, या शब्दात खान्देशकन्या आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल रात्रीच्या सुमारास निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताचे विद्यमान प्रतंप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात काय म्हटले –
आपल्या शोकसंदेशात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाबद्दल मला अतिशय दु:ख झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात खूप जवळून काम केले होते आणि त्यांच्या अफाट ज्ञान, अनुभव असलेला एक अतिशय अभ्यासू सहकारी मी गमावला आहे,
ते एक उच्च प्रतिष्ठेचे नेते होते, जे पक्षाबाहेरील प्रत्येकासाठी अत्यंत आदरणीय होते. ते एक महान संसदपटू होते आणि ‘भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनाने आपल्या देशाने एक आदरणीय आणि समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.
संपूर्ण भारतात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर –
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भारत सरकारच्या वतीने डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत संपूर्ण भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.