ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 29 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 29 ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. या पार्श्वभूमीवर राज्यात उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तत्पुर्वी, त्यांची पाचोऱ्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धींवर जोरदार टीका केली. यानंतर त्यांनी रॅली काढत प्रांताधिकारी कार्यालयात आमदारकीसाठी अर्ज दाखल केला.
पाचोरा-भडगावमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी –
राज्यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशा पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला आला असून याठिकाणी वैशाली सुर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला. असे असताना देखील काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी तर आज काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : चोपडा विधानसभा मतदारसंघ : प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे; आज दोघांनी केला उमेवादारी अर्ज दाखल