मुंबई, 3 मार्च :लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आव्हान केले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? –
मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले असून आता हे लपून राहिलेले नाही. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारे आरक्षण दिले आहे, अशी मराठा समाजाची समज झाली आहे, किंवा त्यांना कळून चुकले आहे. तोच रोष समाजाचा सत्ताधाऱ्यांविरोधात असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या पहिल्या यादीवर काय म्हणाले? –
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असली तरी मात्र, यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, याबाबत महाराष्ट्राची यादी यासाठी तयार होत नाही की, शिंदे व अजित पवार यांना आता दोन-दोन जागा द्यायच्या की तीन-तीन जागा द्यायचे की जास्तीत जास्त चार जागा द्यायच्या, यावर अजून फायनल झालेले नाही. त्यांना चार-चार जागा फायनल होतील आणि त्यावेळेस मला वाटते की, महाराष्ट्रातील यादी जाहीर होईल.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024, भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?