धुळे : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहेत. यातच कोंडाईबारी घाटात मृतदेह सापडलेल्या विसरवाडी येथील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता होता. या व्यक्तीचा खून त्याच्याच पुतण्याने आणि त्याच्या मित्राने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
कोंडाईबारी घाटात मृतदेह सापडलेल्या विसरवाडी येथील सईद शहा चिराग शहा फकीर (वय 28) या तरुणाचा खून त्याच्याच पुतण्या अवेश सलीम शहा (वय२४) व त्याचा मित्र सोहेल ऊर्फ बबलू मुबारक शहा (वय 24, दोन्ही रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी) यांनी केला, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. काका नेहमी शिवीगाळ करायचा. याचाच राग येऊन पुतण्यानेच काकाचा काटा काढला, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
नेमकं काय घडलं होतं –
मृत सईद शहा चिराग शहा फकीर हा 7 रोजी दारू पिऊन त्याचा पुतण्या अवेश शहा याच्या गॅरेजवर आला आणि शिवीगाळ करू लागला. त्याचा राग आल्याने पुतण्या अवेश शहा याने दुपारच्या सुमारास त्याची कार जीजे 15 ओडी 1533 मध्ये त्याचा काका सईद शहा यास बसविले आणि सोबत मित्र सोहेल मुबारक शहा ऊर्फ बबलू याला घेत ते कोंडाईबारीकडे निघाले. यानंतर रस्त्यामध्ये अवेश शहा आणि सोहेल शहा यांनी काका सईद शहा याच्या तोंडावर काळा हातरूमाल बांधून त्याचे नाक- तोंड बंद केले. तसेच दोन्ही हातपाय दोरीच्या सहाय्याने बांधून जिवंत असतानाच कोंडाईबारी घाटावरील पुलाखाली फेकून दिले.

यानंतर कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिरासमोरील पुलाच्या खाली दरीत एक अनोळखी मृतदेह मिळून आला होता. 11 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना समोर आली होती. यानंतर याप्रकरणी साक्री पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मृतदेह नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील सईद शहा चिराग शहा फकीर (वय-28, रा. संतोषी माता गल्ली, ता. विसरवाडी, जि. नंदुरबार) या व्यक्तीचा असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर साक्री पोलिसांनी मृत सई शहा फकीर याचा पुतण्या अवेश सलीम शहा याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याबाबत कबुली दिली. त्याने आपला मित्र सोहेल ऊर्फ बबलू मुबारक शहा (रा. विसरवाडी) याच्या मदतीने आपल्या काकाचा खून केल्याचे कबूल केले. यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन्ही संशयित आरोपींना साक्री पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. तसेच त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
हेही वाचा – पारोळेकरांना टोलमध्ये सवलत; आमदार अमोल पाटील यांनी घेतली समस्येची दखल अन् चर्चेतून काढला मार्ग