पाचोरा, 27 फेब्रुवारी : पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे (प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर के.जी, सिनियर के.जी.) वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. अतिशय दिमागदार पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल स्कूलच्या अध्यक्षा तथा निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य अतिथी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण केल्यानंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बालगोपालांच्या नृत्याविष्कारामध्ये एवढे नाविन्य होते की, समोर उपस्थित सर्व पालक आणि श्रोता वर्ग मंत्रमुग्ध झाला. विशेष म्हणजे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांना मोहित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा आणि विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेल्या संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंग चित्रकथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केला.
शाळेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्या वयात विद्यार्थ्यांना आपली स्वतःची बॅग सांभाळता येत नाही, अशा वयात ही मुले स्टेज सांभाळत आहेत. उत्कृष्ट सादरीकरण करत आहेत, हा विलोभनीय सोहळा म्हणजे सर्वांसाठी पर्वणीच आहे, असे त्यांनी नमूद केले.
पाचोरा तालुक्यात केबलची चोरी, पोलिसांनी अशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या
याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा भारमल, संतोष पाटील, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. यशश्री जाधव हिने केले. तर आभार कु. कुणाल पाटील याने मानले.