यावल, 27 सप्टेंबर : मागच्या महिन्यात यावल तालुक्यात एका 21 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाने एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या पालकांना दिली होती. या रागातून या अल्पवयीन मुलीने या तरुणाच्या हत्येसाठी 2 जणांना चिथावणी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी काल ताब्यात घेतले आहे.
इम्रान युनूस पटेल (वय-21, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) असे या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मागच्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या या घटनेनंतर ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय-19) आणि गजानन रवींद्र कोळी (वय-19) हे दोन्ही जण स्वतःहून पोलिसात हजर झाले होते.
दरम्यान, याप्रकरणातील पोलिसांच्या तपासात तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (वय-19) याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी नागपूर येथील एका 16 वर्षीय मुलीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे संशयाने पाहिले गेले. तसेच तपासादरम्यान तिच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
तिच्या प्रेमसंबंधांची माहिती मृत इम्रान याने तिच्या पालकांना दिली होती. त्यामुळे तिनेच वरील दोघांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या बालिकेची बाल अधिरक्षागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच अन्य तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणाचा तपास यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन करत आहेत.