ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील 16 वर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना आज 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, नातीच्या घटनेबाबत माहिती मिळताच आजोबांना देखील ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुलीचे नाव निकिता संतोष भालेराव (वय-16) व आजोबाचे शामराव खैरे (वय-65) असे आहे.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांत डोंगरमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हिवरा नदी पात्राच्या पाण्याची पातळी वाढलीय. अशातच वडगाव टेक येथील 16 वर्षीय मुलगी ही एका महिलेसोबत नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी महिलेचा अथवा तिचा पाय घसरल्याने ते नदीच्या पाण्यात पडले. यानंतर एकमेकांना वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला वाचविण्यात यश आलं. मात्र, निकीता भालेराव ही नदीच्या मुख्य प्रवाहाच्या पाण्यात आल्याने वाहून गेली.
…अन् आजोबांनी देखील सोडले प्राण –
आपली नात पाण्यात वाहून गेल्याची बातमी समजताच निकीताचे आजोबा शामराव खैरे (वय 65) यांना तीव्र धक्का बसला. हा आघात सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी साडेसात वाजता शामराव खैरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘सात तासांहून अधिक वेळ शोधकार्य; पण…’ –
मुलगी वाहून गेल्याच्या घटनेनंतर काही वेळाने प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रशासन व ग्रामस्थांनी हिवारा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या निकीताचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, रात्रीपर्यंत सात तासांहून अधिक वेळ शोधकार्य झाले तरीही तिचा काही शोध लागला नाही. दरम्यान, दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू झालेले शोधकार्य रात्री अंधार पडताच थांबविण्यात आलं असून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.