ईसा तडवी, प्रतिनिधी
(लासगाव) पाचोरा, 11 मार्च : पाचोरा तालुक्यातील लासगाव परिसरातील बरडीवर उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले होते. दरम्यान, आता लासगाव उपकेंद्राला जोडण्यात आलेल्या या सोलर प्रकल्पाच्या लाईनवरून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान शेती पंपाना दिवसा विजेचा पुरवठा आज 11 मार्चपासून केला जात आहे. सदर सोलरमधे काही तांत्रिक अडचण अल्यास शेती वीज पुरवठा पुर्वीप्रमाणें चालू राहणार आहे.
नेमकी बातमी काय? –
लासगाव उपक्रेंद्राचे सहायक अभियंता दिपक बानुबाकोडे यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला दिलेल्या माहितीप्रमाणे, लासगाव उपकेंद्रातून निघणाऱ्या जुन्ने शेती फिडर, खडकी शेती फिडर आणि लासगाव शेती फिडरमधील शेती पंपाना आज दिनांक 11 मार्चपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान दिवसा विजेचा पुरवठा देण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, लासगाव, सामनेर आणि बांबरूड राणीचे येथील जवळपास 2 हजार शेतकऱ्यांना याचा दिवसा वीज पुरवठ्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
लासगाव सोलर प्रकल्प –
महाराष्ट्र शासनाने कुसुम योजनेअंतर्गत मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याच अंतर्गत पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे 5 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. महावितरणतर्फे मेघा इंजिनिअररिंग ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या एजन्सीतर्फे मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यात लासगाव 33/11 केव्ही उपकेंद्राला या योजनेतंर्गत पाच मेगावॉट सौरऊर्जेची जोड दिली आहे.
गावाच्या ग्रामपंचायतीला काय मिळणार –
- सौर प्रकल्प विकासक सरकारी/सार्वजनिक/ खाजगी जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी किमान 0.5 मेगावॅट ते जास्तीत जास्त 25 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे बांधकाम, संचालन आणि देखभाल पूढील 25 वर्षे करेल.
- प्रकल्प स्थापनेसाठी दिल्या गेलेल्या खाजगी जमिनीसाठी 1 लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर प्रति वर्ष किंवा रेडी रेकनर दराच्या 6% यापैकी जे जास्त असेल इतके भाडे 3% च्या वार्षिक वाढीच्या तरतुदीसह मिळेल .
- 11 केव्ही आणि 33 केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे 25 पैसे प्रति युनिट आणि 15 पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान अश्या प्रकल्पांना मिळेल. ज्या प्रकल्पांनी डिसेंबर 2024 पूर्वी वीज खरेदी करार (PPAs) कार्यान्वित केले असतील आणि ते PPA मध्ये निर्धारित केलेल्या तारखेच्या आत कार्यान्वित सुद्धा झाले असतील.
- या कार्यक्रमांतर्गत ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर प्रकल्प बसवले आहेत त्यांना सामाजिक लाभ स्वरूपात प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपये प्रति वर्ष इतके अनुदान दिले जाणार आहे. तसेच हे अनुदान प्रकल्प सुरू झाल्यापासून 3 वर्षांसाठी दिले जाईल.
हेही वाचा : ‘येत्या काळात पाचोरा-भडगावमध्ये लासगावसारखे सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न करणार’