मुंबई, 27 जून : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या लोकसभेतील पराभूत उमेदवारांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचा कानमंत्र दिला. तसेच पराभवाने खचून न जाता आता विधानसभेसाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागू. विधानसभेसाठी सर्वांनी स्वतःला झोकून देऊन काम करा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभेत होणार नाहीत, यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली पराभूत उमेदवारांसोबत चर्चा –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या पराभूत उमेदवारांशी चर्चा करुन त्यांना नव्या ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच चर्चा संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पराभूत उमेदवारांसोबत स्नेहभोजनही केले. या बैठकीला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.
भाजप करतंय पराभवाचे विश्लेषण –
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचे संघटनेकडून गांभीर्याने मूल्यमापन केले जात असून पक्ष नेमका कुठे कमी पडला याचे देखील विश्लेषण केले जात आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत बैठक पार पडली होती. तसेच दिल्लीत देखील कोअर कमिटीच्या सदस्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली होती. यानंतर गेल्या दोन दिवसांपुर्वीच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावरूनच असे दिसून येतंय की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आतापासूनच कामाला लागले आहे.
हेही वाचा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात, विरोधक ‘या’ मुद्यांवरून सरकारला घेरणार?