चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 27 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन परस्परांवर जोरदार टीका केली होती.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कामकाजाचे एकूण 11 दिवस आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्यास अधिवेशनात प्रत्यक्षात किती दिवस कामकाज होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणे अधिवेशन काळात बघायला मिळाली. या पार्श्वभूमीवर या पावसाळी अधिवेशनात नेमके कुणाचे भाषण वादळी ठरते याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.
विरोधक या मुद्यांवरून सरकारला घेरणार?
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टींमुळे घडून गेल्यामुळे विरोधक या गोष्टींवर महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. यामध्ये पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, ड्रग्ज प्रकरण, होर्डिंग दुर्घटना तसेच परिक्षांमधील घोटाळा, मराठा-ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्यांवरून महाविकास आघाडीतील नेते सरकारची कोंडी करू शकतात. तसेच गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देखील पोलीस भरतीचा मुद्दा अधिवेशात गाजू शकतो.
हेही वाचा : IAS Ayush Prasad Interview : लासगाव बरडी सोलर प्रकल्प, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले?