मुंबई, 24 डिसेंबर : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत आगामी महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार निशाणा साधलाय.
ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती, आघाडी होत राहतात. पण, काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. गेल्या साडेतीन वर्षांपासून आमची महायुती महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. पण आता झालेल्या युत्या या सत्तेसाठी, खुर्चीसाठी तसेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.
महायुती महाराष्ट्रात मजबुतीने उभी –
आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे की, कोण कुणाबद्दल काय म्हणायचे हे जरा बघा. युती कुणाची कुणाशी झाली, तरी आमची महायुती महाराष्ट्रात मजबुतीने उभी आहे. आम्ही लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक महायुतीने जिंकलो. नगर परिषद निवडणुकांमध्ये मविआच्या सगळ्या पक्षांच्या जितक्या जागा आल्या त्यापेक्षा जास्त आमच्या एकट्या शिवसेनेच्या आल्या आहेत. त्यामुळे अशा युत्या या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. मुंबईकर मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? विकासाचे प्रकल्प कुणी अडवले?”, असे सवाल देखील एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले.
View this post on Instagram
मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार –
मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, वसई, विरार नालासोपारापर्यंत गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी, आम्ही क्लस्टर योजना घेतला आहे. पुनर्विकासाचा प्रकल्प घेतला. कारण, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, 40 लाख लोकांना मोफत घरे देणार. मात्र, इतके वर्ष काय प्रयत्न केले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला चालना दिली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ठ केले.
शिंदेंची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका –
शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर अतिशय तीव्र टोला लगावला, जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते राज्य किंवा मुंबई कशी सांभाळणार? असा सवाल करत कोरोना काळात फक्त पैसा खाल्ला. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हाच हे ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असा बोर्ड लावतात. मात्र, मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास हवा असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.






