मुंबई, 18 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सत्ताधारी-विरोध पक्षातील आमदार तसेच मंत्र्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सुरक्षारक्षकाने पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचे दिसून आले. याविरोधात पत्रकारांनी देखील आंदोलन करत संबंधित सुरक्षरक्षकावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेत संबंधित सुरक्षरक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले असल्याचे विधानसभेत सांगितले.
विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं? –
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. असे असताना राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून एकमेकांविरोधात घोषणाबाजी देत आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जात असताना एका सुरक्षारक्षकाकडून पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी पत्रकार आणि सुरक्षरक्षकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने तूर्तास वाद मिटला.
मात्र, पत्रकारांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीमुळे पत्रकारांनी कामबंद करत विधानभवन परिसरात आंदोलन केले. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सुरक्षरक्षकांकडून कामात व्यत्यय आणला जातोय, असा आरोप करत पत्रकारांनी संबंधित सुरक्षारक्षकावर कारवाईची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलन स्थळी जात संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल –
यानंतर, पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली असून यामुळे पत्रकारांचा अवामान होत असल्याचे विधानसभेच्या सभागृहात काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना पटोले यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत बोलताना सांगितले की, नाना पटोले म्हणाले की, पत्रकारांचा अवमान झाला.
View this post on Instagram
त्याबाबतीत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मी आणि आशिष शेलार तसेच इतर दोन मंत्री यांच्या उपस्थितीत ते चार-पाच सुरक्षारक्षक आणि विधानपरिसरातील प्रमुख डीसीपी यांना देखील बोलवले. यावेळी पत्रकारही होते. दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना पत्रकारांबरोबर जे काही गैरवर्तन अथवा चूक केली याबाबत कारवाई करण्याच्या सूचना त्या डीसीपींनी दिलेल्या आहेत. यामुळे पत्रकारांचे समाधान झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.