नंदुरबार, 10 डिसेंबर : नंदुरबार जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. भंगार भरत असताना दोन बालकांच्या डोक्यावर लोखंडी फाटक पडले. यात एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरा बालक जखमी झाला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे घडली. मोईन कासीम शेख (वय 5, रा. डालडा झोपडपट्टी, दोंडाईचा) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सानीयाबी कासम शेख (वय 6, रा. दोंडाईचा) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं –
इरफान शेख युनूस मनियार हा शहादा येथे खेतिया रस्त्यावर मालट्रकमध्ये भंगार भरत होता. याचठिकाणी ही दोन्ही मुले खेळत होती. मात्र, यावेळी ट्रक मागे पुढे करताना या दोन्ही खेळणाऱ्या बालकांच्या डोक्यावर ट्रकचे लोखंडी फाटक पडल्याने मोईन शेख हा बालक गंभीर झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर सानिया ही बालिकासुद्धा गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर हनिफाबी कासम शेख यांनी बालकाच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद दिली असून ट्रकचालक इरफान शेख युनिस मनियार (वय 35) याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.