चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 11 मार्च : दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे दिले जाणारे 2024 या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये महारोगी सेवा समिति, वरोरा या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ भरीव सामाजिक योगदान दिल्याबद्दल डॉ.विकास आमटे तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेले एकलव्य फाऊंडेशनचे संस्थापक राजू केंद्रे यांना सन्मानित केले जाणार आहे.
2009 पासून दीपस्तंभ फाउंडेशन सेवाभावी काम करणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठांना “दीपस्तंभ पुरस्काराने” सन्मानित करत आहे. समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.
2024 या वर्षासाठीचे पुरस्कार खालील प्रमाणे –
महारोगी सेवा समिति, वरोरा या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ भरीव सामाजिक योगदान दिल्याबद्दल डॉ. विकास आमटे यांना “दीपस्तंभ जीवन गौरव कृतज्ञता पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार स्व. डॉ जगन्नाथ वाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो. तसेच “दीपस्तंभ कर्मवीर पुरस्कार”, शिक्षण क्षेत्रामध्ये तथा वंचीतांच्या शिक्षणासाठी विशेष भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार मराठवाडा मित्र मंडळ, पुणे या संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांना जाहीर झाला आहे. तर “दीपस्तंभ विवेकांनद पुरस्कार” देशभरामध्ये कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या “ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे” यांना जाहीर झाला आहे.
एकलव्यचे राजू केंद्रे यांचा होणार सन्मान
सामाजिक कार्यासाठी पूर्ण वेळ झोकून देणाऱ्या तरुणांना अथवा संस्थांना “दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार” दिला जातो. तो खालील व्यक्तींना जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेले एकलव्य फाऊंडेशनचे संस्थापक राजू केंद्रे (लोणार, बुलडाणा) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांगासाठी डिजीटल माध्यम एक्सेसेबल करण्यासाठी कार्यरत असलेले कॉर्पोरेट वकिल अॅड. अमर जैन (ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश), समाजबंध संस्थेच्या माध्यमातून महिला आरोग्य आणि मासिक पाळी या विषयावर कार्यरत सचिन आणि शर्वरी (सोलापूर), तृतीयपंथीयांचे हक्क, न्याय आणि अधिकार या संदर्भात कार्य करणाऱ्या शमिभा पाटील (फैजपूर), शांताई फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील अनाथ आणि निराधारांच्या पुनर्वसनासाठी आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या अश्विनी वेताळ (कराड) यांनाही युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच या प्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात येणार आहे.
चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळालेले राजू केंद्रे यांना दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राजू केंद्रे म्हणाले की, असे पुरस्कार काम करण्यास आणखी प्रेरणा देतात. दीपस्तंभ फाऊंडेशनचे कार्य सर्वश्रुत आहेत आणि एका सामाजिक संस्थेकडून हा पुरस्कार मिळत असल्याने याचा आनंद आहे. यानंतर आणखी जोमाने तसेच ताकदीने काम करुयात. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या वाटेने पुढे जाण्यासाठी मी कटीबद्ध राहील, असे ते म्हणाले.
27 मार्चला होणार सन्मानसोहळा –
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे. येत्या27 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्प, कुसूंबा, जळगाव येथे हा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा : आई-वडील मजूर, मुलाचा लंडनमध्ये सन्मान, कोण आहे विदर्भातील हा तरूण?