मुंबई, 15 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
काल (14 ऑक्टोबर) विरोधकांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले होते. मात्र, दुबार मतदान आणि मतदार यादीतील गोंधळ या दोन प्रमुख मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे.
आज दुपारी पत्रकार परिषद –
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले आणि प्रकाश रेड्डी यांसारखे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
या आहेत शिष्टमंडळाच्या मागण्या –
- निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी पारदर्शकता वाढवावी.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात.
- राज्यातील मतदार यादीतील गोंधळ दूर करावा.
शिष्टमंडळाच्या निवेदनातील हे आहेत मुख्य मुद्दे –
- निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे
- आयोग खरोखरच स्वायत्तपणे काम करतो का, यावर प्रश्नचिन्ह
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान वगळलेल्या मतदारांचा तपशील आजवर जाहीर का केला गेला नाही?
- एखाद्या मतदाराचं नाव वगळलं गेलं असेल, तर त्याला त्याचं कारण लेखी स्वरूपात का दिलं जात नाही?
- आयोगाने मतदार यादी व तिचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा.
- ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नव्याने समाविष्ट झालेल्या नावांची यादी अद्याप प्रसिद्ध का नाही?
- मतदार यादीचा अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे.
- मतदार यादी लपवण्यामागे काही राजकीय दबाव किंवा हेतू आहेत का, याची शंका विरोधकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश






