चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी कार्यक्रमात ते सहभागी झालेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खान्देशातील अत्यंत महत्त्वाच्या अशा नार पार गिरणा प्रकल्पा संदर्भात अत्यंत महत्त्वाची घोषणा केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –
जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासाठी एक चांगली बातमी देतो. आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातून बदलणार आहे. नार पार गिरणा योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे. माननीय मुख्यंत्र्यांच्या नेतृत्त्वात आम्ही याला मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देत आहोत, अशी मोठी घोषणा त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचे काम आपण याठिकाणी करत आहोत. वाघूर प्रकल्पाला 2 हजार 288 कोटी, पाडळसे प्रकल्पाला 4890 कोटी, अशाप्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचे काम आपण या माध्यमातून करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
काय आहे नारपार गिरणा प्रकल्प –
गेल्या अनेक दिवसांपासून नार पार गिरणा संदर्भात खान्देशातील राजकारण पेटले आहे. नार – पार गिरणा खोरे समृद्ध व्हावे याकरिता माजी खासदार उन्मेश पाटील यांनीही गिरणा नदीत आंदोलनही केले आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही नार-पार गिरणा योजना आहे. यासाठी साधारणपणे 7 हजारांहून अधिक कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा तसेच मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
धुळे जिल्ह्यात देखील काही भागांत याचा लाभ होणार आहे. नार-पार गिरणा प्रकल्पामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान, या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून या योजनेला मंजूर मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नार-पारची आशा लागली आहे.
Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत